शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरात पतंग उडवताना गच्चीवरून पडून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
श्रीरामपूरात पतंग उडवताना गच्चीवरून पडून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- मकर संक्रांतीला गच्चीवर पतंग उडवण्याच्या नादात तिसर्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने शहरातील मोरगेवस्ती येथे राहणारा भूषण शरद परदेशी, वय-22 या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली आहे. या घडल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, काल मकर संक्रांतीनिमित्त शहरभर सर्वत्र पतंग उडविणार्यांची धामधूम सुरू होती. याच धामधूमीमध्ये दुपारच्या वेळेस मोरगेवस्ती भागातही मोठया प्रमाणावर तरूण हे पतंग उडवित होते. यामध्ये मोरगेवस्ती येथे राहणारा भूषण शरद परदेशी हाही एका बिल्डींगच्या तिसर्या मजल्यावर पतंग उडवित होता. पतंग उडवित असतानाच्या नादात सायं.5 च्या सुमारास भूषण परदेशी याचा गच्चीवरून तोल गेला. पतंग उडवितांना मागे सरकत असताना त्याचा तोल गेल्याने थेट खाली तिसर्या मजल्यावरून कोसळला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. भूषण परदेशी हा बिल्डींगवरून खाली पडल्याचे समजताच गच्चीवरील पतंग उडविणार्या आणि खाली असणार्या लोकांनी तातडीने त्याला उपचारासाठी शहरातील साखर कामगार रूग्णालयात हलीविले. परंतु त्याला तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर मार लागलेला असल्याने प्रथमोपचार करून तातडीने त्याला नगर येथे हलविण्यात आले. नगर येथे उपचार सुरू असताना आज भूषण परदेशी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.
काल शहरभर अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर पतंगबाजी सुरू होती. तरूण, लहान मुलं या पतंगबाजीचा आनंद घेत होते. मात्र, योग्य ती काळजी न घेतल्याने कशाप्रकारे घटना घडते, याचा प्रत्यय सायंकाळी श्रीरामपूरकरांना आला. पतंग उडविणार्या एका तरूणाचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू होण्याचा प्रकार घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लिफ्टच्या बोगद्यावरील
पत्रा निसटल्याने घटना?
याबाबत, मोरगेवस्ती परिसरातील काही नागरीकांच्या मते भूषण हा पतंग उडवित असताना मागे सरकला. त्यावेळी ज्या जुन्या बिल्डींगवर तो पतंग उडवित होता त्या बिल्डींगला लिफ्ट लावण्यासाठी जागा (बोगदा) सोडण्यात आली आहे. त्यावर पत्रा टाकलेला होता. भूषण याचा पाय त्या पत्र्यावर मागे सरकताना पडल्याने तो पत्रा निसटून थेट तिसर्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला, असे त्या ठिकाणच्या काहींचे मत आहे.