शिवप्रहार न्यूज - अवकाळी गारांचा पाऊस, वीज पडून शेतकरी व गाय ठार; शेती पिकांचे प्रचंड नुकसान

शिवप्रहार न्यूज - अवकाळी गारांचा पाऊस, वीज पडून शेतकरी व गाय ठार; शेती पिकांचे प्रचंड नुकसान

अवकाळी गारांचा पाऊस, वीज पडून शेतकरी व गाय ठार; शेती पिकांचे प्रचंड नुकसान

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- जिल्ह्यात आज दुपारी चार ते पाच च्या दरम्यान ठिकाणी अवकाळी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हाहाकार केला. या अवकाळी पावसात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माहिती घेतली असता अवकाळी पावसात खोकर येथे राजू नामदेव मोरे वय-50 वर्ष यांच्या अंगावर वीज पडली. मोरे यांना नागरिकांनी तातडीने श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रूग्णालयात उपचारासाठी नेले तेथील डॉक्टरांनी मोरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याच भागात एक गाय वीज पडून मृत्युमुखी पडली आहे.

सर्वत्र गारांचा पाऊस पडल्याने व तुफान वादळाने शेतातील गहू, पीक, हरभरा, कांदा यांच्यासह काढायला आलेल्या पिंकांचे प्रचंड नुकसान झाले. मोठ्या कष्टातून घेतलेल्या पिकांचा हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले असून नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने रोख मदत देऊन संकटकाळी धीर देण्याची गरज निर्माण झाली आहे. याचदरम्यान शहारातील पाटाजवळील सिद्धीविनायक मंदिराजवळील एक मोठे झाड रिक्षावर पडून रिक्षाचे नुकसान झाले तसेच ठिकठिकाणी विजेच्या खांबाच्या तारा तुटून काही भागात विजपुरवठा खंडित झाला आहे. या आवकाळी पावसात सर्वत्र मकाच्या दाण्याच्या आकाराच्या गारा टपाटप पडत होत्या. शहरातील नागरिकांनी गारांच्या पावसाचा आनंद घेतला काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.