शिवप्रहार न्यूज- श्रीरामनवमी यात्रोत्सवात थत्ते ग्राऊंडवर पाळणे नाही; जागा बदलली...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामनवमी यात्रोत्सवात थत्ते ग्राऊंडवर पाळणे नाही; जागा बदलली...

श्रीरामनवमी यात्रोत्सवात थत्ते ग्राऊंडवर पाळणे नाही; जागा बदलली...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- तीनदा फेरलिलाव होऊनही श्रीरामपूर नगरपालिका आणि पाळणावाले यांच्यामध्ये पाळण्याच्या लिलावाच्या रक्कमेचा गुंता न सुटल्याने यंदा श्रीरामनवमीत पाळणा हालणार की नाही, अशी साशंकता व्यक्त होत असताना आज शनिवारी दुपारी पाळणावाल्यांनी पालिकेचे थत्ते ग्राऊंड सोडून इतरत्र पाळणे नेण्याचा निर्णय घेतल्याने श्रीरामनवमी यात्रेत यंदा पाळणे हलणार मात्र जागा बदलणार हे स्पष्ट झाले आहे.
  शहरातील वॉर्ड नं. ७ मधील डॉ. चव्हाण हॉस्पीटलच्या पुढे बोंबलेनगरकडे जाणाऱ्या रासकर यांच्या रिकाम्या प्लॉटवर यंदा श्रीरामनवमीचे हे पाळणे भरणार असल्याचे समजते. आज दुपारी याठिकाणी पाळण्याच्या काही गाड्याही आल्या आणि पाळण्याचे सामानही उतरवणे सुरू झाले. नगरपालिकेच्या थत्ते ग्राऊंडच्या जागेचा ठेका गेल्यावेळेस ३४ लाखाला गेला होता. यंदा तो ३१ लाखाला देण्याची तयारी दर्शवली होती मात्र, पाळणेवाले १७ लाखांपासून बोली लावण्याचा आग्रह धरत होते. त्यामुळे दोघांमधील अंतर जादा असल्याने तीनदा फेरलिलाव होऊनही गुंता सुटला नाही. म्हणून काल यात्रा कमिटीला पालिकेने पाळणे लावण्यासंदर्भात पत्र दिले होते. यात्रा कमिटीने यासंदर्भात सहमती दर्शवली किंवा नाही, हे समजण्याच्या आत पाळण्याचे लिलाव घेणाऱ्यांनी पालिकेच्या थत्ते ग्राऊंडचा नाद सोडून थेट वॉर्ड नं. ७ मधील रासकर यांच्या प्लॉटमध्ये पाळणे लावायला सुरूवात केली आहे.
  पालिकेला द्यावे लागणारे १७ किंवा ३४ लाख आता द्यावे लागणार नाही. रासकर यांच्या खासगी जागेत हे पाळणे लागणार आहे. सद्यातरी रासकर यांना किती रक्कम द्यायची हे ठरले नसले तरी ५१ हजारांचा करार केल्याचे समजते. त्यामुळे आता पाळणावाल्यांचे लाखो रूपयांचे भाडे वाचणार असल्याने श्रीरामपूर शहरवासियांना स्वस्तात पाळणे उपलब्ध करून देणे सहच शक्य असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.