शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात महावितरण कर्मचाऱ्याच्या कानफडात हाणली…
श्रीरामपुरात महावितरण कर्मचाऱ्याच्या कानफडात हाणली…
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- मी विजबिल भरलेले असतानासुद्धा तुम्ही लाईट कट कशीकाय केली? असे म्हणत एकाने श्रीरामपूर येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन लिपीकाच्या कानफडात मारण्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
याबाबत, भूषण भिमराज सोनकांबळे, वय-33, धंदा-नोकरी-महावितरण कार्यालय, साळुंके बिल्डींग, श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.28 मार्च रोजी आपण बिलींग विभागात नेहमीप्रमाणे काम करत असताना एक व्यक्ती कार्यालयात आली व एका ग्राहक क्रमांकाचे लाईटबिल प्रिंट काढायला सांगितले ते आपण काढून दिले. तेव्हा त्याने एक महिन्याचे बिल एवढे कसे? असे विचारले असता ते बिल नोव्हेंबर 2022 पासूनचे आहे, असे आपण त्याला सांगितले. त्यानंतर त्या इसमाला आपण सांगितले की, तुम्हाला नावामध्ये बदल करावयाचे असेल तर लाईट बिल भरावे लागेल. तेव्हा त्या इसमाने 4,750 रू.बिल भरले. तेव्हा त्याला नाव विचारले असता त्याने इसाक उस्मान शहा, रा.इदगाह परिसर, संजयनगर, वॉर्ड नं.2 असे सांगितले. इसाक शहा हा नावात बदल न करता कार्यालयातून निघून गेला आणि 15-20 मिनिटांनी पुन्हा एका व्यक्तीबरोबर आला. मी विजबिल भरलेले असताना तुम्ही लाईट कट कशी केली? अशी त्याने विचारणा केली. तेव्हा आपण त्याला समजावून सांगत असताना सदर इसाक शहा याने आपले काहीएक ऐकून न घेता आपल्या तोडावर व गालावर हाताने चापटी मारून शिवीगाळ करत तू कार्यालयाच्या बाहेर ये, मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले असून यावरून इसाक उस्मान शहा, रा.संजयनगर याच्याविरोधात भादंवि कलम 323, 353, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.