शिवप्रहार न्युज - महिला डॉक्टरांचे गंठण चोरले;श्रीरामपुरात गंठणचोरीचे सत्र सुरुच…
महिला डॉक्टरांचे गंठण चोरले;श्रीरामपुरात गंठणचोरीचे सत्र सुरुच…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- नवरात्र उत्सव सुरू असल्याने देवीची आरती करून परतणाऱ्या महिला डॉक्टर आपल्या इतर डॉक्टर मैत्रिणींशी बोलत असताना सुमारे १ लाख रूपयांचे सोन्याचे गंठण ओढून नेण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, दि.१८ ऑक्टोबर रोजी सायं. ७ वा. डॉ. सरोज विनायक मोरगे या जिजामाता चौकात देवीच्या आरतीसाठी गेल्या होत्या.तेथून आरती झाल्यावर सुभाष कॉलनी येथे पटारे मॅडम यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या घरी त्या आल्या होत्या. त्यानंतर ८.१५ वाजता डॉ.सरोज मोरगे या पटारे यांच्या हॉस्पीटलसमोर असतांना डॉ.स्फूर्ती जैस्वाल, डॉ.नेहा बैरागी, डॉ.सरिता देशपांडे या त्यांना भेटल्याने त्या त्यांच्यासोबत रस्त्यावर बोलत उभ्या होत्या. तेव्हा अचानकपणे काळया रंगाच्या मोटारसायकलवर दोन तरूण आले व त्यांनी या डॉ.महिला बोलत असलेल्या ठिकाणी गाडी हळू केली आणि डॉ.सरोज मोरगे यांच्या गळ्यातील ९८ हजार रू. किंमतीची सोन्याची पोत त्यात रियल डायमंडचे पेडल हे ओढून सदर चोरटे हे सुसाट वेगाने निघून गेले.
या मोटारसायकलवर पुढे बसलेल्याच्या अंगात पांढरा शर्ट व मागे बसलेल्याच्या अंगात हिरवा शर्ट होता. अशाप्रकारे उत्सवाच्या काळात रस्त्यावर गर्दी असताना गंठनचोरांनी गंठन चोरून नेल्याने महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत भादंवि कलम ३४, ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.