शिवप्रहार न्युज - शिवस्मारकासह जिल्हा मागणीसाठी श्रीरामपुरात विराट मोर्चा;हजारोंचा सहभाग…
शिवस्मारकासह जिल्हा मागणीसाठी श्रीरामपुरात विराट मोर्चा;हजारोंचा सहभाग…
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या वतीने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) सरकारने "श्रीरामपूर जिल्हा " घोषित करावा हया मागणीकरिता विराट मोर्चा काढण्यात आला.
शनिवार दि. २० जानेवारी रोजी श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथून मोर्चास सुरूवात झाली. सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथुन निघुन मेनरोडमार्गे -भगसिंगचौक- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, गिरमे चौक, तुळजाभवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे श्रीराम मंदिर चौकात आला. श्रीराम मंदिर चौकामध्ये मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी सरकारचे व प्रशासनाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) "श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी नगर जिल्हयाचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नविन जिल्हा होणार नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होवू देणार नाही असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप (नाना) भोसले यांनी सांगितले. तर शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावाने म्हणजेच “श्रीरामपूर” हया नावाने भारतात जिल्हा अस्तित्वात नाही. तरी हिंदुस्थानातला श्रीरामांच्या नावाचा पहिला जिल्हा होण्याचा मान श्रीरामपूरला मिळावा.
या विराट मोर्चात श्रीरामभक्त-शिवभक्त, व्यापारी, वकील, इंजिनियर, कामगार, राजकीय नेतेमंडळी, पदाधीकारी यांच्यासह शिवप्रहारचे मावळे प्रचंड मोठया संख्येने सहभागी झाले होते.