शिवप्रहार न्यूज- ६०० रू. ब्रासने वाळू विक्रीचा शुभारंभ ना.विखेंच्या हस्ते संपन्न...

शिवप्रहार न्यूज- ६०० रू. ब्रासने वाळू विक्रीचा शुभारंभ ना.विखेंच्या हस्ते संपन्न...

६०० रू. ब्रासने वाळू विक्रीचा शुभारंभ ना.विखेंच्या हस्ते संपन्न...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे, हे दर्शवणारा आजचा हा ६०० रू. ब्रास वाळू देण्याचा निर्णय आहे. एवढेच नव्हे तर यापुढे आतापर्यंत प्रलंबित असणाऱ्या जिल्हातील सर्व शेती मोजण्या १ जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे आणि १ जुलै पासून १५ दिवसांच्या आत शेतीची मोजणी करून त्याचा उतारा शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असल्याची माहीती राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

   राज्यातील ६०० रू. ब्रासने वाळू विक्री करण्याचा पहिला शुभारंभ आज १ मे महाराष्ट्र दिनी श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे ना.विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. बोलताना ना. विखे म्हणाले, वाळूमुळे गावोगावी गुंडांच्या टोळया तयार झाल्या. शहराबरोबर ग्रामीण भागाचे स्वास्थ्य बिघडले. सामान्य माणसांना कोणी वाली राहीला नव्हता. त्यामुळे या वाळूमाफियांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. वाळू उपशामुळे नदीकाठची शेती उध्वस्त होत होती. सर्वसामान्य माणसाला ६०० रू. दराने वाळू देणारा हा ऐतिहासिक' निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे सहकार्य केले. 

   श्रीरामपूर शहर आणि जिल्हयातील गुन्हेगारीवर बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, श्रीरामपुरात नंग्या तलवारी घेवून लोकं फिरतात, गावठी कटटे सापडतात. या गावठी कट्ट्यांचा आणि नंग्या तलवारींचा तातडीने बंदोबस्त करा, कोणाचा फोन आला तर मला सांगा, परंतु पोलीसांनी याबाबत कठोर भूमिका घेवून श्रीरामपूर शहरच नव्हे तर नगर जिल्हा दहशतमुक्त करण्याचे काम करावे. १ मे ला ६०० रूपये ब्रासने वाळू दिलीच जाऊ शकत नाही, असे माजी महसूलमंत्री म्हणाले होते आणि न मिळाली तर गाड्या लोणीला पाठवा, असे ते म्हणाले होते. परंतु, आज १ मे ला वाळू ६०० रू. ब्रासने सुरू झाल्याने या गाड्या भरून संगमनेरला पाठवा, असा टोला ना. विखे यांनी आ. थोरातांना नाव न घेता लगावला.

   यावेळी आ.लहू कानडे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डिवायएसपी संदीप मिटके,  प्रांताधिकारी किरण सावंत, जिल्हापरिषद महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.