शिवप्रहार न्युज- गोदावरीत तिघे बुडाले; देवदुत महिलेने स्वतःच्या साडीने दोघांना काढले बाहेर...

शिवप्रहार न्युज-  गोदावरीत तिघे बुडाले; देवदुत महिलेने स्वतःच्या साडीने दोघांना काढले बाहेर...

गोदावरीत तिघे बुडाले; देवदुत महिलेने स्वतःच्या साडीने दोघांना काढले बाहेर...

   कोपरगाव (शिवप्रहार न्युज)- नगर, नाशिक जिल्ह्यात तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्याचे चेरापुंजी असलेल्या घाटघर येथे गुरुवारी सायंकाळी २४ तासांत मिलीलीटर (१३ इंच) पावसाची नोंद झाली. परिणामी भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच नाशिकमधील पाऊसही जोरदार सुरु आहे. त्यामुळे दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आला आहे.

दरम्यान हाच विसर्ग सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप काढण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय २५), अमोल तांगतोडे (वय ३०), प्रदीप तांगतोडे (वय २८) व नारायण तांगतोडे (वय ५२) हे गेले होते.

        यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत चालल्याचे नदी किनारी शेळी चारण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार यांच्या निदर्शनास येताच ताईबाई पवार यांनी आपली स्वतःची साडी सोडून तरुणांच्या दिशेने फेकून त्यातील अमोल व प्रदीप या दोघांना आधार देऊन वाचवले व त्या देवदूत ठरल्या. प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले. अमोल व प्रदीप हेही पाण्यामध्ये गुदमरले होते परंतु छाती दाबून उलटे करून पोटातून पाणी काढण्यात आले व त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

       दरम्यान या घटनेत शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय २५) पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला होता. त्याचा अद्याप शोध लागू न शकल्याने तो बेपत्ताच आहे. याबाबत बोलताना तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी सांगितले की, प्रवाह जास्त असल्याने शोध कार्य सुरू आहे.