शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरच्या तरुणांनी अमरनाथ ढगफुटीत महिला-मुलांना वाचवले…
श्रीरामपूरच्या तरुणांनी अमरनाथ ढगफुटीत महिला-मुलांना वाचवले…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 06 मध्ये असणाऱ्या स्मशानभूमी रोडवरील कालभैरवनाथ मित्र मंडळ व जय भोले मित्र मंडळ या दोन्ही मंडळाचे सदस्य जम्मु-काश्मीर मधील अमरनाथला देवदर्शनासाठी गेले आहे.यामध्ये देवा चावरिया,विशाल आडांगळे ,शंकर जाधव ,व्यंकटेश आडांगळे ,विकास जगधने ,यश जगधने, मनोज भालेराव ,साहिल झिंगारे आणि करण अडांगळे या तरुणांचा समावेश असून या तरुणांनी काल आठ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पवित्र अमरनाथ देवदर्शन केले.
खाली उतरत असताना बरोबर साडेपाच वाजता त्यांच्यासमोर अचानक एक भली मोठी दरड ढगफुटीमुळे कोसळली.यावेळी या तरुणांनी ही घटना 50 फुटांवरून पहिली.त्यानंतर त्यांनी तात्काळ दरडीखाली अडकलेल्या भाविकांचा जीव वाचवण्यासाठी चालू असलेल्या ऑपरेशनमध्ये सहभाग घेऊन पाच महिला व दोन-तीन मुलांना वाचवण्यात यश मिळवले. स्थानिक प्रशासन व लष्करी दलाच्यावतीने या ठिकाणी जोरदार मदतकार्य चालू आहे.
दरम्यान या घटनेमध्ये 16 भाविकांचा मृत्यू झाला असून 45 बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने जाहीर केली आहे.श्रीरामपूरच्या तरुणांनी अमरनाथ येथे केलेल्या या मदत कार्याबद्दल श्रीरामपूरकरांकडुन त्यांचे कौतुक होत आहे.