शिवप्रहार न्युज - टाकळीभानजवळ हॉटेल चालकाचा खून...

शिवप्रहार न्युज -  टाकळीभानजवळ हॉटेल चालकाचा खून...

टाकळीभानजवळ हॉटेल चालकाचा खून...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान जवळील लोखंडी फॉल नजीक आपल्या हॉटेलमध्ये झोपलेल्या हॉटेल चालकाचा खून करण्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर ते नेवासा रस्त्यावर बाळासाहेब सखाहरी तुवर (वय - ६०) यांचे ओमसाई या नावाने लोखंडी फॉलनजीक कारवाडी परिसरात हॉटेल असून या हॉटेल व्यवसायातून तूवर हे आपला उदरनिर्वाह करीत होते. काल मंगळवार दि. १२ मार्च २०२४ रोजी दिवसभर हॉटेलचा व्यवसाय करून रात्री हॉटेल बंद करून ते झोपले होते. मात्र आज बुधवार दिनांक १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता हॉटेल का उघडले नाही ? म्हणून नागरिकांनी हॉटेल चालकास आवाज दिला. परंतु आतून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून व दरवाजातून डोकावून पाहिले असता बाळासाहेब तुवर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांच्या डोक्यावर कुठल्यातरी टणक हत्याराने मारल्याचे दिसत होते. हे पाहून नागरीकांनी नेवासा तालुका पोलीस स्टेशनला कळवून याबाबत माहिती दिली. नेवासा तालुका पोलीस स्टेशनचे पोनि.धनंजय जाधव यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोनि. धनंजय जाधव यांनी घटनेची बाब गंभीर असून याचा उलगडा होण्यासाठी श्वान पथक व फिंगरप्रिंट पथक यांना पाचरण केले. सदर घटनेचा पंचनामा करून तुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.    

      याचा पुढील तपास नेवासा तालुक्याचे पोनि.धनंजय जाधव करीत आहे. मयत बाळासाहेब तुवर यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार असल्याचे समजते. दरम्यान, बाळासाहेब तुवर यांचा खून स्थानिकच कोणी किंवा रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांनी लुटीच्या उद्देशाने केला की, इतर कोणत्या कारणाने केला? हे पोलीस तपासात उघड होईल.