शिवप्रहार न्युज - ०३ अल्पवयीन पळवले; पालकवर्गात खळबळ...
०३ अल्पवयीन पळवले; पालकवर्गात खळबळ...
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- जिल्हयामध्ये अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून आता पुन्हा राहुरी तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीला जावयाने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.तर अकोले तालुक्यातील बारीगाव येथे लग्नातून १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्यात आले आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेण्याची घटना समोर आली आहे.
राहुरी तालुक्यातील संक्रापूर परिसरात असणाऱ्या खपके यांच्या शेताजवळून रविवार दि.७ एप्रिल रोजी सायं. ५ च्या दरम्यान १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रविंद्र नावाच्या मावस जावयाने मोटारसायकलवरून पळवून नेले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्यावरून मावस जावई रविंद्र याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील बारीगाव येथील नातेवाईकांच्या लग्नामध्ये आलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञाताने लग्नामधूनच फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने राजूर पोलिसात फिर्याद दिल्यावरून मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा येथील असलेला १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा पुण्यात शिक्षण घेत होता. तो नुकताच नातेवाईकांमधील एका मुलीच्या लग्नाला मालुंजा येथे आला होता. गावामध्ये असलेले लग्न आटोपल्यानंतर मुलाची आई घरी गेली परंतू सदर अल्पवयीन मुलगा लग्न आटोपून रात्री १२ वाजले तरी घरी आला नाही. मुलाच्या आई वडीलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळू न आल्याने कोणीतरी त्याला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून मुलाच्या वडीलांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून मुलाला पळवून नेणाऱ्या अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.