शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरला शनिवारबरोबर आता बुधवारीही पाणी नाही...
श्रीरामपुरला शनिवारबरोबर आता बुधवारीही पाणी नाही...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - चांगला पाऊस होवून नवीन पाणी धरणात येत नाही तोपर्यंत येत्या १ जूनपासून श्रीरामपूर शहराला शनिवारबरोबर दर बुधवारीही पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत आणि मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकावर सावंत व जाधव यांनी म्हटले आहे की, पाटबंधारे विभागाकडून सध्या सोडण्यात आलेले शेतीच्या पाण्याचे हे मान्सून पूर्वीचे शेवटचे पाणी आवर्तन आहे. या आवर्तनातून नगरपरिषदेचे दोन्ही साठवण तलाव भरून घेण्यात आले आहेत. पाटबंधारे विभागाकडून यानंतर कोणतेही पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. भंडारदरा व निळवंडे धरणातील पाणीसाठा विचारात घेता चांगले पर्जन्यमान होऊन धरणात नवीन पाण्याची आवक झाल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळणे शक्य नाही. त्यामुळे नगरपरिषदेकडे सध्या उपलब्ध असणारा पाण्याचा साठा काटकसरीने वापरणे अनिवार्य झालेले आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडून उद्या दि.०१ जून २०२४ पासून दर बुधवार व शनिवार पाणीपुरवठा खंडीत ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासक किरण सावंत व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी केले आहे.