शिवप्रहार न्युज - मुरकुटेंनी, भाव किती देणार ? मागचे ५०० कधी देणार हे आधी सांगावे ! 

शिवप्रहार न्युज -  मुरकुटेंनी, भाव किती देणार ? मागचे ५०० कधी देणार हे आधी सांगावे ! 

मुरकुटेंनी, भाव किती देणार ? मागचे ५०० कधी देणार हे आधी सांगावे ! 

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर तालुक्यातील अशोकचे ऊस उत्पादक सभासद व कामगार यांनी नेहमी कमी भाव घेवून मुरकुटेंचा ' हट्ट ' पुरवला ! आता शेतकरी कामगार यांचे पैसे कधी देणार हे आधी सांगावे व मग संचालक व बगलबच्चांनी ऊस अशोकला द्या असे सांगावे असा सल्ला व मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आबासाहेब भोसले यांनी म्हटले आहे.प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की

,आम्ही अशोक सहकारी साखर कारखान्यावर नितांत प्रेम करणारे आहोत व शेतकरी आजही कारखान्याला ऊस पुरवठा करण्याच्या मानसिकतेत आहेत.परंतु दर किती देणार ? याबाबत कारखाना प्रशासन तोंड उघडायला तयार नसल्याने तसेच सातत्याने कमी मिळणारा दर आणि ऊसाची होणारी हेळसांड यामुळे आपला शेती धंदा वाचविण्यासाठी शिकलेला तरुण शेतकरी इतर पर्याय शोधतांना दिसत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे व माजी संचालक ज्ञानदेव साळुंके यांच्या पत्रकास उत्तर देताना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सहकारात एकमेव चार्टर्ड अकाऊंटंट लाभलेल्या नेतृत्वात कर्जाच्या खाईत बुडालेल्या ‘अशोक’ची वाटचाल अधोगतीकडे होताना दिसत आहे. आपल्याच ‘मस्तीत’ असलेल्या नेतृत्वाने ३१२ कोटींचे कर्ज आणि २६२ कोटींचे देणे सभासदांच्या माथी मारले आहे. मागील एकाच अहवाल सालात झालेल्या २८ कोटीच्या संचित तोट्याची जबाबदारी कोणाची? इतर चांगल्या कारखान्यांना एक क्विंटल साखर बनवायला १६०४ रुपये खर्च येतो.मग तुम्हाला २७७० रुपये कसा? आपल्याकडे सोन्याचा मुलामा चढवला जातो कि काय हेही सांगावे. सभासदांना उच्च भावाचे आमिष दाखवून मोठमोठे प्रकल्प उभे केले त्याचा फायदा शेतकऱ्यांना काय झाला हे शेतकऱ्यांना उसासाठी भावनिक साद घालताना या संचालकांनी का पटवून दिले नाही?

       अतिशय मेहनतीने उभ्या केलेल्या पिकाला रास्त भाव मिळावा तेवढीच अपेक्षा शेतकऱ्यांची असताना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत ५०० रुपये कमी भाव देताना शेतकऱ्यांनी ‘अशोक’ लाच ऊस घालावा ही अपेक्षा कितपत योग्य आहे?

"अशोक" त्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत अशोकच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात स्वत:च्या सुनेवर व मुलावर आरोप करताना त्यांना व त्यांच्या मुलांना दिलेल्या इस्टेटीचा उल्लेख करुन ‘अशोक’ मध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची कबुली सभासद व ऊस उत्पादक विसरलेले नाहीत.प्रवरा कारखाना सारखा नाही तर आम्ही किमान गणेश कारखाना इतका दर मागत होतो, तो का दिलेला नाही? कामगारांचे ९ महिन्यापासून थकलेले पगार कधी देणार त्यांचे नावावर काढलेले कर्जाला जबाबदार कोण हेही सांगावे.

     अतिरिक्त २०० कोटी कर्ज घेतले असल्याचा शेरा ऑडीट मेमो मध्ये आहे त्याची परतफेड करताना ‘अशोक’ला प्रती क्विंटल साखरेमागे किमान ७०० रु. फेडावे लागणार आहेत.त्यामुळे दर किती व कसा देणार हे जाहीर करावे आम्ही ऊस ‘अशोक’ लाच देऊ कारण अशोक आमच्या पूर्वजांनी ऊभा केलेला आहे तुम्ही नाही.‘अशोक’च्या संचालक मंडळानेच ‘अशोक’ वर संघटीत दरोडा घातल्याचे कितीतरी आरोप यापुर्वी झालेले आहेत. ऊस उत्पादक सभासदांनी, शेतकऱ्यांनी व कामगारांनी किती दिवस पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला पोसायचे, तुमचे "नाद" पुर्ण करायचे हे तरी सांगा !

शिळ्या कढीला उत आणतांना अशोक बंधारे व पाण्यासाठीच्या संघर्षाची आठवण करून देताना अशोक बंधाऱ्यांची मालकी व त्यांची सध्याची परिस्थिती यावरही चर्चा करणे अपेक्षित होते. १९८६/८७ या दोन वर्षात भीषण दुष्काळ असल्याने कार्यक्षेत्रात उसाची लागवड अत्यल्प होती. सलग दोन वर्ष भंडारदरा धरण न भरल्याने आवर्तने कमी झाली.त्यामुळे जेमतेम २५-३० फुट खोलीच्या विहिरी कोरड्या पडल्याने ऊस लागवड झालेली नव्हती परंतु आपले संकट शेतकऱ्यांनी संघर्ष करुन आपल्या विहिरींची खोली वाढवून बोअर घेऊन पाणी उपलब्ध केले व ऊस शेती वाढवली.जर अशोक बंधा-यांमुळे ऊस शेती वाढली असेल तर आज अशोक बंधाऱ्यांची दुरावस्था का?आधुनिकतेची कास धरून ठिबक सिंचनाचा वापर करून आपले मळे फुलविले याच्यात ‘अशोक’ प्रशासनाचे काय योगदान? भानुदास मुरकुटे यांनी सत्तेत असताना त्यांच्या आमदारकीच्या काळात केलेली फसवे आंदोलने शेतकरी विसरलेले नाहीत. भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या माध्यमातून अध्यक्ष सुरेश ताके यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

१९८८ नंतर भंडारदरा धरण सातत्याने भरायला लागले व श्रीरामपूर नगरपरिषदेच्या साठवण तलावामुळे शेतीचे सिंचनाचे व पिण्याचे पाण्याचे आवर्तन एकत्र व नियमित व्हायला लागले.म्हणून कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढली हेही महत्त्वाचे आहे.

      गोदावरी व प्रवरा नदी वरील बंधारे पुलोद काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री स्व. गोविंदराव आदिकांनी मंजुर करुन त्यावर निधी मंजूर करुन ठेवला होता म्हणून ते झाले.त्यात या महाशयांनी श्रेय घेऊ नये. अडचणीच्या काळात जिल्ह्याबाहेरून चार -दोन ट्रक ऊस आणल्याचे दाखले दिले जातात पण करमाळा भागात केलेला ऊस शेतीच्या प्रयोगाचा उल्लेख संचालकांनी केलेला नाह. त्या करमाळा प्रकल्पातील हुशार इंजिनिअर आजही तुमच्या मांडीवर खेळताना दिसतो आहे. कारखान्याच्या या परिस्थितीला कारखान्याचे सूत्रधार व नाकर्ते संचालक कारणीभूत असल्याने इतरांवर अथवा शेतकऱ्यांवर खापर फोडण्याचे काहीही कारण नाही.

      गेल्या वर्षी अशोकने सभासदांनी २७०० रु. पेमेंट केले . उर्वरीत ५०० रु. राहीलेले ऊसाचे पेमेन्ट आज अखेर केले नाही . मग चालु गळीताला भाव काय ? पैसे कधी देणार हे आधी सांगा ! मग ऊस कुठे घालायचा हे बोला ! असेही जितेंद्र आबासाहेब भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .