शिवप्रहार न्युज - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी-महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील..
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी-महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील..
श्रीरामपूर -राज्य शासनाने सुरू केलेल्या एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ५ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. श्रीरामपूर तालुक्यात पावसाने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची मदत राज्य शासनाने देवून दिलासा दिला असल्याची माहिती महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथे दिली.
महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. निवेदनाद्वारे नागरिकांनी दिलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देवून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
तसेच प्रधानमंत्री आवास योजना पथ विक्रेत्यांसाठी असलेल्या योजनेतील लाभार्थी व महिला बचतगटांना धनादेशाचे वितरण महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी 'शासन आपल्या दारी'उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू आहे. जिल्ह्याचा सर्वात मोठा कार्यक्रम शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या माध्यामातून प्रत्येक व्यक्तीला योजनेचा लाभ मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास' या मंत्राने योजनांची यशस्वी अंमलबजावणी मागील नऊ वर्षात केली आहे. कोव्हीड संकट आपण सर्वानी अनुभवले. तेव्हापासून आज नागरिकांना मोफत धान्य मिळत आहे. घरकुल योजना, आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य सुविधा नागरिकांना मिळत आहेत. आता राज्य सरकारने राज्यातील बारा कोटी नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला. राज्यात शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गारपिटीत नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५६ लाख रुपयांची मदत सरकारने दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेच्या मनातील सरकार असल्याने सरकारकडून तसेच निर्णय होत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे जाणून घेण्यासाठी 'शासन आपल्या दारी' उपक्रम सुरू असून, शासन लोकांमध्ये जावून काम करणारे असल्याचा संदेश या माध्यमातून देत असल्याचे महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
महसूलमंत्र्यांनी यावेळी हजारो नागरिकांचे अर्ज स्विकारले.शहरातील उत्सव मंगल कार्यालयात नागरिकांनी निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक नागरिकांचा अर्ज स्विकारून प्रश्न समाजावून घेत त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्नाच्या सोडवणूकी बाबत सूचना केल्या.
याप्रसंगी श्रीरामपूर प्रांताधिकारी किरण सावंत,तसेच स्थानिक पदाधिकारी दीपक पटारे,नितीन दिनकर , मारुती बिंगले , शरद नवले केतन खोरे, संदीप चव्हाण रवि पाटील, दता जाधव यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.