शिवप्रहार न्युज - जनार्दन स्वामींची ३४ वी पुण्यतिथी तपोवनातील कुंभमेला मैदानावरील कार्यक्रमाचा समारोप…
जनार्दन स्वामींची ३४ वी पुण्यतिथी तपोवनातील कुंभमेला मैदानावरील कार्यक्रमाचा समारोप…
प्रतिनिधी/श्रीरामपुर
मयुर फिंपाळे
*चरण पादुकांना अभिषेक, पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम*
राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तपोवनातील कुंभमेळा मैदान येथे जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात सहभागी १० हजारांवर अनुष्ठानार्थीनी समारोपप्रसंगी व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केला. या सोहळ्याचा समारोप रविवारी (दि. २४) श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीत झाला.
'ज्याचा गुरूचरणी निस्सीम भाव, त्याचे मनोरथ पूरवी देव' तसेच 'निष्कामता निजदृष्टी अनंतपुण्यकोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठोवाठीं तै होय भेटी हरिप्रियांची' या भागवत ओव्यांचा अर्थ नीट समजून घ्या, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा, मनुष्याचे जन्माला येण्याचे हे एकच कारण आहे, तसे देवाला जन्माला येण्याचे तीन कारणे आहेत. ते म्हणजे साबूंचे रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना, या तीन कारणांसाठी देवाचा अवतार होतो. वाढावया सुख, भक्तो, भाव, धर्म कुळाचार, नाम विठोबाचे या सहा कारणांसाठी संर्ताचा जन्म होत असतो. याचप्रमाणे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामीमहाराज यांनी देखील जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला, बाबाजींनी शेवटच्या श्वासापर्यंत निष्काम कर्मयोग साधत जनकल्याण केले, असे प्रतिपादन उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.
जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत शहरात तपोवनात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यादरम्यान महाजपानुष्ठान, १०८ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ, श्रीराम कथा,अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, भागवत पारायण, नामसंकीर्तन, अभिषेक श्रमदान, प्रवचन, सत्संग याबरोबरच रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, महाआरती आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याची सांगता आज तपोवन येथे विविध क्षेत्रांतील मान्यवर व साधू-संत-ब्राह्मण-अतिथी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी पहाटे नित्यनियम विधी, परमपूज्य बाबाजींच्या पादुकांचा अभिषेक, पालखी मिरवणूक, संत, ब्राह्मण व अतिथी पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर काशी येथील महामंडलेश्वर श्री श्री १००८ भवानीनंदन यतीजी महाराज,जम्मू-काश्मीर येथील महामंडलेश्वर दिव्यानंद सरस्वती महाराज, श्री १०८ महंत स्वामी सेवागिरीजी महाराज, स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज यांसह आश्रमिय संत, ब्रह्मचारी, तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, त्यांच्या पत्नी अनिताताई भुसे, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुपार भोसले, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, नाशिकच्या आमदार सरोज आहिरे, उत्तर प्रदेशचे माजी आमदार संतोष यादव, रामराज्य यात्रेचे प्रमुख युवापत्रकार प्रदोष चव्हाणके,महाराष्ट्र२४तास मुख्य संपादक मयुरजी फिंपाळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर संत उपस्थित होते.
----------------------------------------------
*प्रत्येकाला प्रसाद*
सोहळ्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती उपाशी जाऊ नये यासाठी १५०० किलोपेक्षा जास्त मसाले भात, लापशी तसेच बुंदी असा प्रसाद तयार करण्यात आला होता. तो प्रत्येकाला देण्यात आला.
---------------------------------------------
*स्वदेशी वस्तू वापरा, देशी गाई पाळा*
मार्गदर्शनात शांतिगिरी महाराज म्हणाले की, जय बाबाजी भक्त परिवार देव-देश-धर्मासाठी कार्य करत आहे. बाबाजीनी सुरू केलेल्या जपानुष्ठान परंपरेत मोठी शक्ती असून तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळणार आहे. या वेळी प्रचंड जयघोषात जपानुष्ठान करणाऱ्या हजारो साधकांच्या मौनव्रताची सांगता करण्यात आली.
----------------------------------------------
*नामजप वह्यांद्वारे मूर्ती*
या सोहळ्यानिमित्त भाविकांनी २० हजारांवर वह्यांवर 'ओम जनार्दनाय नमः' हा नामजप लिहिला. या सर्व वह्या वेरूळ, ओझर आश्रमात संकलित करण्यात येतील. या वह्यांपासून जनार्दन स्वामी महाराजांची मूर्ती साकारण्यात येईल.