शिवप्रहार न्युज - विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा राज्यात अग्रेसर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

शिवप्रहार न्युज -  विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा राज्यात अग्रेसर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा राज्यात अग्रेसर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

नगर (जि.मा.का.वृत्तसेवा ):-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ लक्षित लाभार्त्यापर्यंत पोहोचवून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सामान्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

   शिर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतिष दिघे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

   पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून सामान्यांना देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ५५० गावांमध्ये ही यात्रा पोहोचून योजनांचा जागर केला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर असून एकही लाभार्थी केंद्र व राज्य शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकसंघपणे काम करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.

    राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे त्यांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी राज्यातील 12 कोटी जनतेला पाच लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोयही शासनाने केली असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून शिर्डीकडे पाहिले जाते. शिर्डीच्या सर्वांगिण विकासावर अधिक भर देण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, शेती महामंडळाची औद्योगिक वसाहतीच्या उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये अनेक मोठं मोठे उद्योगांची उभारणी होऊन परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळून अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.त्याचबरोबर श्री साईबाबा यांच्या जीवनपटावर आधारित थिमपार्क निर्मितीसाठी ३० एकर जागा देण्यात आली आहे. तसेच शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी नवीन इमारत उभी करण्यासाठीही जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

  राज्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.

      यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रचार रथास पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

      कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.