शिवप्रहार न्युज - जिल्हा न्यायाधीश 'एसीबीच्या'च्या जाळ्यात; ५ लाखांची मागितली लाच...
जिल्हा न्यायाधीश 'एसीबीच्या'च्या जाळ्यात; ५ लाखांची मागितली लाच...
सातारा (शिवप्रहार न्युज)- साता-यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणातील महिला तक्रारदाराच्या वडिलांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून, त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी सत्र न्यायालय, सातारा येथे जामीन अर्ज दाखल केलेला आहे. तो जामीन अर्ज मंजूर करुन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात यांनी लोकसेवक न्यायाधीश धनंजय निकम यांच्या सांगण्याप्रमाणे व त्यांच्यासाठी तक्रारदार यांचेकडे पाच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. न्यायाधीश धनंजय निकम यांनी खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात यांच्याशी संगनमत करुन स्वतः साठी तक्रारदार यांच्या वडीलांचा त्यांच्या कोर्टात प्रलंबित असलेला जामीन अर्ज मंजूर करुन तक्रारदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी नमूद दोन खाजगी इसमांचे मार्फतीने तक्रारदाराकडे ५ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली.
लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखवून तसेच ती लाच रक्कम नमुद खाजगी इसमांच्या मार्फत मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी न्यायाधीश निकम यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासोबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. पुढील तपास सुरु आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे. पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल अशी आशा असते. न्यायमूर्तीकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र, चक्क न्यायाधीशच लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.