शिवप्रहार न्युज - स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
अहिल्यानगर ( शिवप्रहार न्यूज):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागासारख्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्व.लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात आणण्याचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण करण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना. विखे पाटील यांचे अहिल्यानगर येथे प्रथमच आगमन झाले. डॉ. विखे पाटील फाऊंडेशन येथे जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्णासाहेब हजारे यांचे आशिर्वाद त्यांनी घेतले. त्यांनी केलेल्या सत्काराचाही स्विकार केला. आ. शिवाजीराव कर्डीले, आ. काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मा.आ.अरुणकाका जगताप, नाशिक विभागाचे आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर आदिंनी त्यांचे स्वागत केले.
माध्यमांशी बोलताना ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्य मंत्रीमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्याची एक संधी असून, विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्या जबाबदारीतून स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे दायित्व मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविले.कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात वळविण्यासाठी डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मसुदा सादर केला होता. त्याचेच आता धोरणात रुपांतर झाले. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्वकांक्षी प्रकल्प पुर्ण करणाचे ध्येय ठेवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याने गोदावरीच्या तुटीच्या खो-यात पाणी वळविण्याचे ऐतिहासिक काम भविष्यात पुर्ण करण्यासाठी आता वाटचाल असेल. कृष्णा खोऱ्यातील पाणी प्रश्नाबाबतही निश्चित असे धोरण घ्यावे लागेल. बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण, शेतीच्या पाण्याचे निर्माण होणारे प्रश्न, पाण्याची उधळपट्टी थांबविणे आणि पाणी सोडण्याच्या वितरण व्यवस्थेत चांगली सुधारणा करणे. यासाठी आता काम करावे लागणार असल्याचे यावेळी ना. विखे पाटील म्हणाले.