शिवप्रहार न्युज - चितळीत बिबट्याचा धुमाकूळ, मुलगी जखमी; ०३ पिंजरे लावले...
चितळीत बिबट्याचा धुमाकूळ, मुलगी जखमी; ०३ पिंजरे लावले...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- राहाता तालुक्यातील चितळी येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून एकाच दिवशी तीन ते चार नागरिकांवर हल्ला चढविला असून त्यात सिद्धी विकास वाघ,या १५ वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याने तिला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल दवाखान्यात दाखल केले आहे.
गेल्या सहा महिन्यापासून चितळीत बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. तीन-चार महिन्यापूर्वी एका चार वर्षे वय असलेल्या बालकाचा त्यात बळी गेल्याने बिबट्याचा धसका संपूर्ण गावाने घेतला आहे. त्यात रानवस्ती बरोबर गावात भर वस्तीतही बिबट्या राजरोसपणे दिसून येत आहे. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वनविभागावर संताप व्यक्त होत आहे. चितळी येथील स्टेशन ते चितळी गाव रोडवर वर्दळीच्या ठिकाणी काल सायंकाळी सातच्या सुमारास एकाच वेळी लागोपाठ नितीन तनपुरे, संदीप वाघ, संभाजी तनपुरे त्याचबरोबर सिद्धी वाघ यांच्यावर हल्ला केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. याच रस्त्याने गावातील शेकडो शाळकरी मुले ये-जा करत असतात, त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास रास्ता रोकोसह संबंधित वनविभागाच्या कार्यालयसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान सकाळी ग्रामसभेत झालेल्या घटनेवरून वन विभागाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या व तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर वन विभागाच्या अधिका-यांनी या परिसरात भेट देत 03 ठिकाणी पिंजरे लावले आहेत.