शिवप्रहार न्युज - खंडाळ्यात ११ एकर ऊस जळाला; नुकसान भरपाईची मागणी..
खंडाळ्यात ११ एकर ऊस जळाला; नुकसान भरपाईची मागणी...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे ४ शेतकऱ्यांचा सव्वा अकरा एकर ऊस जळून मोठे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी घडली. खंडाळा शिवारात आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जावून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या अग्नीशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली.
दरम्यान, खंडाळा येथील ग्राम महसूल अधिकारी पवार, पोलीस पाटील कृष्णा अभंग यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचासमक्ष पंचनामा केला. पंचनाम्यात शंकर चांगदेव सदाफळ (९० गुंठे), द्रोपदाबाई रंगनाथ ढोकचोळे (९० गुंठे), नवनाथ गंगाधर ढोकचौळे (९० गुंठे), बबन किसन ढोकचौळे (१.८० हेक्टर), असा एकूण सव्वा आकरा एकर ऊस तसेच ठिबक सिंचनच्या नळ्या, कॉक, पाईप, असे साहित्य जळाल्याने सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले.
सदर परिसरात उसाचे क्षेत्र खराब असल्याने ऊसतोड मजूर ऊस पेटवून तोडणी करीत होते, असा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे संबधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली जात आहे.