शिवप्रहार न्युज - दुधडेअरी वाल्याची १७ लाखांची रोकड लुटली; खळबळ...
दुधडेअरी वाल्याची १७ लाखांची रोकड लुटली; खळबळ...
राहुरी (शिवप्रहार न्युज)- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे बँकेत भरणा करण्यासाठी चाललेल्या दूध डेअरीच्या कर्मचाऱ्यांची चार चाकी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून तब्बल १७ लाख रुपयांची रोख रक्कम लुटून नेण्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक समजलेली माहीती अशी की, ब्राह्मणी येथील माऊली दुध डेअरीवरील मॅनेजर व एक कर्मचारी आज सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान गावातील जिल्हा बॅंकेच्या शाखेत १७ लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी निघाले असता काळ्या रंगाच्या किया कंपनीच्या चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात चार भामट्यांनी ब्राम्हणी- बांबोरी रस्तावरील तांबे वस्ती परिसरात गाडीला गाडी आडवी लावुन गाडीच्या काचा फोडून चालकास धारदार शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली व गाडीतील १७ लाख रूपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे अशी माहिती मिळत आहे.
यावेळी लुटारूंबरोबर एक पल्सर मोटारसायकलही होती. रक्कम लुटल्यानंतर चारचाकी गाडी आणि पल्सर हे सुसाट त्या ठिकाणाहून पसार झाले. याप्रकरणी मात्र दुग्ध व्यवसायिकांमध्ये घबराट पसरली असून भरदिवसा अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी तात्काळ अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबर्मे, डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपास सुरू केला आहे. दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.