शिवप्रहार न्यूज- चिकन लवकर दिले नाही म्हणून हॉटेलमध्ये गोळीबार;श्रीरामपूर तालुका पो.ठाण्यात गुन्हा दाखल…
चिकन लवकर दिले नाही म्हणून हॉटेलमध्ये गोळीबार;श्रीरामपूर तालुका पो.ठाण्यात गुन्हा दाखल…
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या वाकडी गावच्या शिवारात वाकडी ते गणेशनगर रस्त्यावर जेवणासाठी आलेल्या ग्राहकास चिकन लवकर दिले नाही या कारणातून हॉटेलमध्ये गोळीबार करून हॉटेलचालकाला डोक्यात गावठी कट्टा मारून जखमी करून गळ्यातील सोन्याचे लॉकेट लुटून ५ लाखांची खंडणी मागीतली. विशेष म्हणजे हा थरारक प्रकार काल दि. ५ मे रोजी भर दुपारी २.३० ते ४.३० च्या दरम्यान घडला.
घटनेची खबर मिळताच डिवायएसपी संदीप मिटके, तालुका पोलीस स्टेशनचे पोनि खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींचा कसून शोध सुरू झाला आहे. या घटनेने मात्र हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे.
याबाबत हॉटेलचालक विजय हरिभाऊ चोळके, वय ३५, रा. चोळकेवाडी, अस्तगाव, ता. राहाता या तरुणाने श्रीरामपूर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी सतिश रावसाहेब वायदंडे, रमेश तान्हाजी वायदंडे, दोघे रा.गणेशनगर, ता. राहाता, गोरक्षनाथ भुसाळ, दत्तात्रय जगताप, दोघे रा. रामपूरवाडी, ता. राहाता यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३९७, ३८६, ३४, आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेलचालक विजय हरिभाऊ चोळके यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, वाकडी गणेशनगर रस्त्यावर वाकडी शिवारात रस्त्याच्या कडेला माझे हॉटेल न्यू आनंद असून तेथे काल दुपारी २.३० च्या सुमारास वरील चौघे आरोपी जेवण करण्यासाठी आले. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. चिकन लवकर शिजविले नाही या कारणावरून चौघा आरोपींनी हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ सुरू केली. तेव्हा आरोपीने त्याच्याजवळील गावठी कट्टयातून गोळीबार केला. तसेच माझ्या डोक्याला गावठी कट्टयाची मूठ मारून जखमी केले. माझ्या अंगावरील गळयातील सोन्याचे लॉकेट, बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. ५ लाख रूपय तू दे, तू जर ५ लाख रू. दिले नाही दिले तर तुझा गेम करून टाकू, अशी धमकी दिली, असे विजय चोळके यांनी पोलिस फिर्यादीत म्हटले आहे.
पोनि खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई निकम हे पुढील तपास करीत आहेत. चिकनवरून हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान ताजी बातमी अशी की,कर्तव्य दक्ष डीवायएसपी संदिप मिटके यांनी कसून तपास करत गोळीबार प्रकरणातले आरोपी सतीष वायदंडे,रमेश वायदंडे,गोरक्षनाथ धुमाळ ,दतात्रय जगताप या चारही आरोपींना अटक केली असून डीवाएएसपी संदिप मिटके यांचे मार्गदर्शना खाली पोनि खाडे व पोलीसांनी काही तासात आरोपी पकडले आहे.